'देहलीज़ ऊँची है ये पार करा दे' 
 -श्रीराम मोहिते 




जगातल्या प्रत्येक माणसाला आपल्या जन्मभूमीविषयी अतिशय प्रेम असतं. आणि ते असणं साहजिकच असतं. कितीही जग फिरलो तरीही आपल्या मुळांची ओढ सुटत नाही. भूमीविषयीच्या या आस्थेला जेव्हा एक संकुचित राजकीय अर्थ चिकटतो तेंव्हा आंधळ्या राष्ट्रवादाचा जन्म होतो. धर्म, जात, रक्त यासारखेच देश हेसुद्धा निखळ मानवी मूल्यांमधले एक कुंपण होऊन बसले की हळूहळू त्यातून एक विखारी हिंसा तयार होऊ लागते. मग युद्ध हेच सर्व राजकीय प्रश्नाचे उत्तर वाटू लागते. एकमेकांना ठेचून काढण्याची भाषा म्हणजेच देशप्रेम ठरू लागते. तलवारी,तोफा ,रणगाडे,आणि बंदुकाच मग राष्ट्रीय प्रतीके वाटू लागतात. हिंसेच्या या गदारोळात शांतता,अहिंसा ,माणसामाणसांमधील प्रेम,आस्था ,अहिंसा यांचा आग्रह एक तर दुबळेपणा ठरतो किंवा देशद्रोहच.
                                       'राझी' हा मेघना गुलजार दिग्दर्शित चित्रपट राष्ट्रवाद,देशप्रेम यांच्या पलीकडे असणाऱ्या व्यापक मानवी मूल्यांचे आणि वैश्विक संबंधांचे अतिशय सूक्ष्म धागे अलवारपणे विणत जातो. राझी रूढार्थाने 'हेरपट' असला तरी आपल्याकडच्या हेरपटात असणारी एकांगी आणि भडक मांडणी टाळत अधिक समंजसपणे वास्तवाचा वेध घेतो. टिपिकल हेरपटात ज्याप्रमाणे विरुद्ध देशातली सर्वच पात्रे खलनायकी अवतारात दाखवली जातात. स्वकीयांचे दोष लपवले जातात आणि परक्यांचे दोष अधिकच ठळक उग्र करून मांडले जातात. दोन देशांमधील लोकांच्या भावना भडकतील अशा प्रकारचे भडक,आक्रमक संवाद पेरले जातात. यातून मग अतिरेकी राष्ट्रवाद अधिकच भयावह होत जातो. मानवी आस्थेचे चिरंतन प्रश्न यात कुठल्याकुठे उडून जातात. तसे 'राझी'मध्ये घडत नाही.या सर्व प्रकाराला फाटा देऊन वास्तवाचे, माणसांचे ,स्वभावाचे अतिशय तटस्थ, पूर्वग्रहरहित असे चित्रण केले जाते. आणि हीच बाब या चित्रपटाला मोठी खोली देऊन जाते. अधिक अस्सल बनवते.
                                   ' राझी' पारंपरिक 'स्पाय ड्रामा' पेक्षा वेगळा ठरतो तो त्यातल्या संयत हाताळणीमुळे. अतिशय सटल असं टेकिंग आणि आशयाच्या पृष्ठस्तराखाली असणाऱ्या अनेक बारीकसारीक जागा सहजपणे दर्शवणारे चित्रण ही या चित्रपटाची मोठी बलस्थाने आहेत. १९७१ च्या सुमारास भारत पाकिस्तानमध्ये असणाऱ्या शीतयुध्दसदृश्य पार्श्वभूमीवर राझीचे कथानक घडते.युद्धाचे वारे अवतीभवती घोंगावण्याची चिन्हे दिसत आहेत. आणि त्यापूर्वी घडणाऱ्या एका विलक्षण नाट्यमय घटनेची अतिशय तरल अशी मांडणी चित्रपट करतो. हे युद्ध फार मोठ्या थराला गेले नाही याचे कारण या नाट्यमय घटनेत दडलेले होते.हरिंदर सिक्का लिखित 'कॉलिंग सेहमत' या कादंबरीतून या घटनेचे अनेक पदर उलगडले आहेत. मेघना गुलझार दिग्दर्शित 'राझी' हा चित्रपट याच कादंबरीवर आधारित आहे. 
'राझी'ची कथा आहे सेहमत(आलिया भट ) नावाच्या एका जिगरबाज तरुण मुलीची. तिने पाकिस्तानच्या सीमेपल्याड जाऊन पार पडलेल्या एका विलक्षण मोहिमेची. या मोहिमेला अर्थातच देशप्रेम, राष्ट्रभक्ती यांची मूळ  प्रेरणा असली तरीही राष्ट्रवादाच्या रूढ ,चाकोरीबद्ध व्याख्येपलीकडे जाऊन चिरंतन मानवी संवेदना ,मानवी मूल्ये यांचा जो पदर या कहाणीला आहे तो या कथानकातील पारंपरिक देशप्रेमाच्या पलीकडे जाऊन अधिक उन्नत माणूसपण घडवण्यास मदत करतो. वैश्विक आस्था व्यक्त करतो.सेहमतचे वडील हिदायत खान(रजत कपूर) हे भारतीय गुप्तहेर वरवर पाहता  पाकिस्तानला गुप्त माहिती पुरवण्याचे काम करत असल्याचे भासवून खरेतर पाकिस्तानातील गुप्त माहिती भारताला पुरवत असतात. अचानकपणे त्यांना आपल्याला फुफुसाचा ट्युमर असल्याचे कळते. याचवेळी पाकिस्तान भारताविरुद्ध काहीतरी कट रचत असल्याचे त्यांना समजते.आजारपणामुळे हिदायत खान हेरगिरीच्या कामगिरीवर आपली मुलगी सेहमतला पाठवण्याचे ठरवतो. आपले वडील आणि आजोबानी देशासाठी दिलेल्या योगदानाचा वारसा सांगत सेहमत या मोहिमेसाठी तयार होते. यासाठी सेहमतचे लग्न पाकिस्तानातील उच्चपदस्थ ब्रिगेडियर सय्यद यांचा मुलगा इकबालशी( विकी कौशल) ठरवले जाते.एक गुप्तहेर म्हणून तिला प्रशिक्षित करण्याची जबाबदारी खालिद मीर (जयदीप अहलावत) यांच्यावर असते. लग्नानंतर पाकिस्तानात दाखल झालेल्या सेहमतची अतिशय उत्कंठावर्धक गुप्त मोहीम हा या चित्रपटाचा खरा गाभा आहे.
                                    या कहाणीतला सर्वात महत्वाचा भाग आहे तो देशप्रेम,राष्ट्रवाद यांच्या अतिरेकी भूमिकेमुळे कलुषित होत जाणाऱ्या मानवी संवेदनेचा.पाकिस्तानच्या गुप्त हालचाली भारताला पोहचवणारी सेहमत कोणत्या कोणत्या मानसिक आंदोलनातून जाते त्याचे प्रत्ययकारी चित्रण 'राझी'मधून होते.इकबालशी लग्न होऊन त्यांच्या घरी गेल्यानंतर त्या कुटुंबाच्या प्रेमामुळे एकीकडे सेहमतचे गुंतत जाणे, आणि आपल्या देशासाठी तिथल्याच निरपराध, बेसावध माणसांना धूर्तपणे मारावे लागण्यातून येणारी हतबलता अशा द्वंद्वात सापडलेली सेहमत आलियाने अतिशय उत्तमपणे साकारली आहे.जयदीप हलवत,रजत कपूर आणि अमृता खानविलकर यांनी आपल्या भूमिकांमधूनही कमालीचा ठसा उमटवला आहे.विशेष उल्लेख करावा तो जयदीप अहलावत यांच्या जबरदस्त अभिनयाचा.एक करारी कर्तव्यनिष्ठ अधिकारी,कठोर प्रशिक्षक आणि संवेदनशील माणूस अशा सर्वच कंगोऱ्यांना स्पर्श करत त्यांनी उभा केलेला खालिद मीर अक्षरशः प्रेक्षणीय ठरतो.आलियाच्या खालोखाल जयदीप यांची भूमिका संस्मरणीय ठरते.इतर सर्वच कलाकारांनी आपल्या भूमिका सुंदर वठवलेल्या आहेत.विकी कौशलच्या भूमिकेला पटकथेतच फारसा वाव नसल्याने मर्यादा येतात.शिशिर शर्मा यांच्या छोट्या भूमिकेतही आपला ठसा उमटवतात. कास्टिंग आणि अभिनयाच्या दृष्टीने चित्रपट परिपूर्ण म्हणता येईल.
                                  मेघना गुलजार यांची पटकथा सेहमतचा मानसिक आणि शारीरिक प्रवास अतिशय समंजसपणे रेखाटते.मात्र काही ठिकाणी केली गेलेली परिचयात्मक प्रसंगांची योजना तितकीशी पटत नाही. उदा.सेहमतचे विद्यापीठातले प्रसंग कथानकाशी संवादी वाटत नाहीत.पण अशा बारीक सारीक मर्यादांमुळे चित्रपटाचा परिणाम कुठेही उणावत नाही. शंकर-एहसान-लॉय यांचं संगीत हे या चित्रपटाचं आणखी एक महत्वाचं वैशिष्टय म्हणता येईल. ए वतन ,दिलबरो,आणि राझी ही तीनही गाणी अत्यंत श्रवणीय तर आहेतच त्याचबरोबर चित्रपटाच्या आशयात अगदी मुरून गेल्यासारखी वाटतात. उपरी वाटत नाहीत. ही गाणी कुठेही कथानकाला अडथळा किंवा रिलीफ म्हणून न येत आशयाचा एक अभिन्न असा भाग म्हणून येतात म्हणूनच दीर्घकाळ लक्षात राहतात. अलीकडच्या काळात आशयाशी एकरूप होणारी गाणी दुर्मिळ होत जाताना राझीमधून मात्र एक सुखद आश्वासन मिळते. ए वतन हे गाणे गुलजार यांच्या प्रतिभेचा एक सुंदर आविष्कार आहे. राष्ट्रवादाची 'दहलीज' ओलांडून ते भूमीविषयीच्या आदिम प्रेमाचे नितळ रूप आपल्यासमोर ठेवते.सहजसुंदर आणि अर्थपूर्ण गाण्यांमुळे चित्रपटाला
काव्यात्मक तरलता प्राप्त होते.
               'दिलबरो' या गाण्यात लग्न होऊन वडिलांचे स्वप्न घेऊन देशाची सीमा ओलांडणाऱ्या सेहमतच्या तोंडी गुलजार यांचे विलक्षण सहजसुंदर शब्द आहेत.
ऊँगली पकड़ के तूने
चलना सिखाया था ना
देहलीज़ ऊँची है ये
पार करा दे
"बाबा,बोट धरून तुम्ही मला चालायला शिकवलंत. आता मात्र मोठ्या आव्हानाची एक उंच 'दहलीज' माझ्यासमोर उभी आहे.तुम्हाला सोडून जाताना ही दहलीज ओलांडायला तुम्हीच मला ताकद देऊ शकता."
ही दहलीज नुसती देशाची सीमा ओलांडण्याची नसते किंवा देशासाठी कराव्या लागणाऱ्या त्यागाची नसते.खरेतर ती असते देशादेशांनी आपल्यामध्ये निर्माण केलेल्या कुंपणाची, युद्धखोरीची,हिंसेची,अशांततेची. ही 'दहलीज' पार करण्याचे सामर्थ्य आपल्याला मिळो आणि त्यापल्याडचा माणूसपणाच्या खरा अर्थ आपल्याला सापडो असे आवाहन हा चित्रपट आपल्याला करतो.

-श्रीराम मोहिते
 ९८२२४६०१७४
shrirammohite@gmail.com


Comments

Popular posts from this blog

स्वत्वशोधाचा मुग्ध प्रवास : लेथ जोशी