स्वत्वशोधाचा मुग्ध प्रवास : लेथ जोशी


             काळ जसजसा पुढे सरकत असतो तसतसे आपला भवताल बदलत जाणे अटळ असते. काळाच्या निर्मम प्रवाहापुढे भल्याभल्या अजस्र ताकदीलाही नमावं लागतं. काळाचा अदृश्य आणि अतर्क्य प्रवाह आपल्या जगण्यात नानाविध उलथापालथी घडवून आणत असतो. बऱ्याचदा काळ जे बदल घडवून आणत असतो त्याचा बरेवाईटपणा व्यक्तिसापेक्ष असतो. म्हणजे एकासाठी मोठा वादळासारखा वाटणारा बदल दुसऱ्यासाठी कदाचित अगदी मामुली असू शकतो. एखाद्या व्यक्तीच्या भावजीवनात या बदलांनी उडवलेली खळबळ इतरांसाठी मात्र नगण्य असू शकते; पण त्या व्यक्तीसाठी मात्र ती प्रचंड हादरवून टाकणारी असते. बदलत्या तंत्रज्ञानामुळे माणसाच्या जीवनातही एक अशीच अदृश्य खळबळ माजवलेली दिसते. अर्थातच या खळबळीचे स्वरूप बरचसे अंतर्गत असल्यामुळे बाहेरून तिचा परिणाम जाणवत नाही. मात्र तिने घडवून आणलेले मानसिक, वैचारिक बदल फार महत्वाचे आणि खोलवर परिणाम करणारे आहेत. आधुनिक काळात या बदलांचा वेग अगदी भोवंडून टाकणारा होता. आपली अवघी जाणीव आणि नेणिवही त्यांनी व्यापून टाकणारा होता. या प्रचंड वेगामुळे अगदी कालचे तंत्रज्ञान आज जुने होत गेले. पण जुन्या तंत्रज्ञानाशी अनेक वर्षांचे जे भावबंध घट्ट होत गेलेले असतात ; ते असे एकाएकी क्षणात टाकून देणे साऱ्यांनाच जमतं असं नाही. एका तंत्रज्ञानाशी जुळलेले मानवी भावबंध आणि त्या तंत्रज्ञानाने घडवलेला जीवनक्रम, त्यातूनच फुलत गेलेला आणि जणू आपल्या अस्तित्वालाच व्यापून असलेला एक हळवा बंध अचानक तोडून फेकून देणे सोपे नसते.
                          तंत्रज्ञानातील अपरिहार्य सुधारणांमुळे जुन्या तंत्राशी माणसाचे जोडले गेलेले नाते तुटत जाणे एका भावनिक आंदोलनाला जन्म देणारे ठरते. हे तुटत जाणे अनेकपदरी असते. बऱ्याचदा जुने तंत्रज्ञान मानवी कौशल्याला बळ पुरवणारे आणि अधिक घाटदार असूनही केवळ सुधारणेच्या नावाखाली अधिक उत्पादनाच्या हव्यासापोटी ते मोडीत काढले जाते. सौष्ठवाची, कलात्मकतेची जागा केवळ साचेबद्धतेने भरून काढण्याचा प्रयत्न सुरु होतो. गुणवत्तेची जागा केवळ चकचकीत आवरणांनी भरून काढण्याचा घाट घातला जातो. तेंव्हा तंत्रज्ञानाच्या अजस्र ताकदीपुढे तिला अर्थपूर्ण बनवू शकणारी ही मानवी संवेदना हळूहळू हद्दपार होऊ लागते. तेव्हा हे जाणिवांचे तुटत जाणे अधिक गहिरे आणि धारदार बनते. तंत्रज्ञान आणि त्याच्याशी अतूटपणे जोडला गेलेला माणूस यांच्यातील या नात्याचे, त्यातील पेचांचे एक विलक्षण दर्शन 'लेथ जोशी' या चित्रपटातून घडते. नवे तंत्रज्ञान अचानक येऊन समोर ठाकते तेंव्हा या जुन्या तंत्राशी अतूटपणे जोडली गेलेल्या माणसांचे काय होत असेल ? एका क्षणात त्यांचे कौशल्य, सौष्ठवपूर्ण काम असे कालबाह्य ठरणे त्यांना कसे अंतर्बाह्य हादरवून टाकणारे असू शकते याचे अनेक तरल पदर दिग्दर्शक मंगेश जोशी 'लेथ जोशी'मधून अतिशय ताकदीने उलगडत नेतात.
                          अद्ययावत यांत्रिकीकरणाच्या अपरिहार्य अशा रेट्यात बाजूला फेकल्या गेलेल्या एका सामान्य पण कुशल लेथ कारागिराची ही कथा आहे. ऑटोमोशनच्या आधुनिक संगणकीय प्रणालीमुळे जुनी लेथ मशीन आता कालबाह्य ठरत जात आहेत. त्यामुळे लेथ मशीनवर काम करणाऱ्या विजू जोशी या कुशल कारागिराला अचानकपणे नोकरीला मुकावे लागते. लेथ मशीनवरचे काम हेच जणू विजू जोशींचे अस्तित्व आहे. आपल्या कामाशी आणि पर्यायाने लेथ मशीनशी असणाऱ्या त्यांच्या अतूट नात्यामुळे त्यांना 'लेथ जोशी' या नावानेच ओळखले जाते. 'लेथ जोशी' हीच त्यांच्या जगण्याची खरी ओळख बनते. ऑटोमोशनमुळे ही ओळखच पुसली जाण्याच्या मार्गावर आहे. आणि त्यामुळेच विजू जोशींच्या भावविश्वात एक विलक्षण अबोल अशी खळबळ उडाली आहे. ही ओळख जपण्याची त्यांची जी आतल्या आत  धडपड सुरु होते तिचा प्रवास हा लेथ जोशी चित्रपटाचा गाभा आहे. भवतालाच्या दबवून टाकणाऱ्या गतीमुळे होत जाणाऱ्या बदलांना अबोलपणे निरखत आपल्या जगण्याचा हरवलेला खरा अर्थ शोधणाऱ्या एका सामान्य माणसाची ही विलक्षण तरल गोष्ट त्यातल्या अनेक मूक पण सूचक जागांमुळे विलक्षण अनुभव देते.
                                 लेथ मशीन जाऊन आता सगळे काम कम्प्युटरवरून होत जाणार आहे आणि विजू जोशींना मात्र त्याच्याशी जोडून घेणे शक्य होत नाही. एखाद्या वादकाच्या त्याच्या वाद्याशी जशा तारा जुळलेल्या असतात किंवा एखाद्या बॅट्समनच्या त्याच्या नेहमीच्या बॅट्सशी जे एक नाते जोडलेले असते तसेच विजू जोशींचे लेथ मशीनशी जोडले गेलेले असते.त्यांच्याकडून लेथ मशीन काढून घेणे म्हणजे जणू एखाद्या वादकाचे वाद्य काढून घेणे किंवा फलंदाजांची बॅट काढून घेण्यासारखे असते.
                                या पेचप्रसंगातून सुटकेचे एक प्रेक्षक म्हणून आपण काही व्यवहार्य आडाखे मनाशी जुळवत राहतो. त्यातला पहिला म्हणजे अर्थातच नव्या तंत्राचा स्वीकार करून काळाबरोबर चालत राहण्याचा आणि दुसरा असतो पर्याय न सापडल्याने सगळ्यातून मोकळे होऊन,सगळे सोडून देऊन निःसंग बनण्याचा. पण लेथ जोशींच्या एका स्वयंभू सत्वशोधाला असले ऊसने रेडिमेड पर्याय पुरे ठरणारे नसतात. आणि त्यामुळेच या कहाणीला एक वेगळे गहिरे परिमाण लाभते. ढोबळ सामाजिक वास्तवाची सुलभीकृत रंजक आवृत्ती बेतून सर्वमान्य अशा हुकमी मुक्कामावर जाण्याचे टाळत 'लेथ जोशी' हा चित्रपट जगण्यातल्या एका अस्सल पेचाचे अनेक बारीक सारीक धागे हळुवारपणे उलगडत जातो. बहुतांश लोकांना प्रश्नांची तयार उत्तरे आवडतात. कारण त्यात सोपी पळवाट निवडण्याची सुरक्षितता असते. वास्तवाच्या त्रासातून लगेच मोकळा श्वास आपल्याला हवा असतो. त्याला भिडण्याचे धैर्य नसते. मात्र रेडिमेड उत्तरांचे पूर्वनियोजित मुक्काम गाठत राहण्याचा हट्टाग्रह सोडून प्रश्नांच्या छोट्या छोट्या अर्थपूर्ण छटांना तपशीलवार स्पर्श करण्याचा यशस्वी प्रयत्न 'लेथ जोशी' हा चित्रपट करतो. हे त्याचे मोठे बलस्थान आहे. जगण्यातल्या एका मूलभूत संघर्षातून हवीहवीशी तात्कालिक सुटका करणाऱ्या उत्तरांपेक्षा प्रश्नांच्या या नानाविध छटाच अनेकदा अटळ जीवनप्रवाहाचे समंजस भान देतात. म्हणूनच रंजनाचे लोकप्रिय आडाखे सोडून या कलाकृतीने निर्माण केलेल्या एका अर्थपूर्ण पण अबोल शांततेला भिडावे लागते. 'लेथ जोशीसारख्या चित्रपटांच्या अनुभवाची ती पूर्वअट ठरते. every word has consequences.every silence,too .या सार्त्र च्या विधानाचा प्रत्यय या चित्रपटातून सतत येत राहतो.
                       काळाच्या बदलत्या धारणांशी सतत सांधा जोडू पाहणारी जोशींची पत्नी(अश्विनी गिरी), बदललेल्या काळाशी पूर्णपणे एकरूप झालेला, प्रसंगी त्यातल्या अडचणींना फाट्यावर मारण्याची धमक अंगी बाणवणारा; या काळाचा अस्सल प्रतिनिधी मुलगा दिनू (ओम भुतकर), अंधत्व आणि म्हातारपण यामुळे काळापासून अलगद दूर फेकली गेलेली आजी (सेवा चोहान) आणि लेथ मशीनचे काम सुटल्यावर भजन-कीर्तनात सहजपणे रमणारा जोशींचा सहकारी अशा सूचक पात्र उभारणीमधून दिग्दर्शक या पेचातून बाहेर पडण्याच्या पर्यायांची प्रभावी मांडणी करतो. दिनू पुरेसा बनेलपणा अंगी बनवल्यामुळे समस्यांची चटपटीत उत्तरे शोधणारा आजचा तरुण आहे.जोशींची बायको मात्र दोन काळाच्या मध्यावर उभी चाचपडते आहे. ती नवऱ्याला आवडणार नाही म्हणून आधुनिक हेअरस्टाईल करायला चाचरणारी पण पुढच्या क्षणी निर्धाराने करून टाकणारी ; चारशेचा रिचार्ज न करता शंभरच्या पुरतो असा आधीच्या काळात शोभणारा विचार करणारी , आजच्या काळाबरोबर वेग राखण्याची कसरत करताना जुन्या काळातली घट्ट मुळं सांभाळत चालणारी स्त्री आहे. आजीच्या भूतकाळ व्यापून असलेल्या अंधाऱ्या विश्वाला वर्तमानात डोकावण्याचा एक पर्याय सापडलेला असतो तो टीव्हीवरच्या ७८८ नंबरचे चॅनेल 'ऐकत' बसण्याचा. आणि दुसरा समर्थांच्या रेकॉर्डेड जपाचा. पण अर्थातच या कुठल्याच पर्यायात 'लेथ जोशींना' आपल्या आंतरिक हतबलतेतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधता येणारा नसतोच. या अगतिकतेतून आकाराला येणाऱ्या त्यांच्या एका मुग्ध, अबोल घुसमटीचा एक समंजस हुंकार या चित्रपटातून प्रत्ययकारी पद्धतीने व्यक्त होतो. स्वत्वशोधाच्या अशा स्वयंभू प्रश्नांना रेडिमेड पर्याय नाकारूनच सामोरे जाता येते.याचा प्रत्यय हा चित्रपट देतो. काळाचा वेग सहज आपलासा करणाऱ्यांना स्वत्वाचा हा आग्रह टोकाचा हट्टी, दुराग्रही  आणि कालबाह्य वाटणे स्वाभाविक आहे. पण अशा स्वत्वशोधातच अस्सल जगण्याचे अटळ सूत्र सामावलेले आहे हेही लक्षात घेणे महत्वाचे आहे; हे अतिशय शांतपणे पण प्रभावीपणे सांगतो.
                            अतिशय संयत पण विलक्षण अर्थवाही छायाचित्रण आणि उत्तम अभिनय यासाठी हा चित्रपट पाहणे आवश्यक ठरते. चित्तरंजन गिरी या अभिनेत्याने उभे केलेले 'लेथ जोशी' केवळ अविस्मरणीय आहेत. त्यांनी आपल्या 'टोन डाऊन' प्रकारच्या अंडरअक्टिंगमधून व्यक्त केलेली एक अबोल हतबलता आणि मंद स्मितहास्यामधून व्यक्त होणारी प्रगाढ जीवनेच्छा यांची सुंदर गुंफण लाजवाब म्हणता येईल अशी आहे. विलक्षण संयत अभिनयाचा हा एक वस्तुपाठ ठरावा असा नमुना आहे. अश्विनी गिरी यांनी उभी केलेली 'बायको' आणि सेवा चोहान यांची 'आजी' भाव खाऊन जातात. ओम भुतकरनेही आपल्या भूमिकेत धमाल आणली आहे. सत्यजीत शोभा श्रीराम यांचे छायाचित्रण या कथेच्या गहिऱ्या आशयाला विलक्षण अर्थपूर्ण सौन्दर्य मिळवून देतं. सारंग कुलकर्णी ,पियुष शहा यांचं संगीत आणि ध्वनी चित्रपटाच्या एकूण परिणामात महत्वाची भर घालणारे आहे. 
                                       सुमार चित्रपटांच्या प्रचंड चलतीच्या काळात काहीतरी महत्वाचे आणि तितकेच उत्कट सांगू पाहणाऱ्या 'लेथ जोशी'सारख्या उत्तम कलाकृतींना प्रेक्षकांच्या सक्रिय प्रतिसादाची आत्यंतिक गरज असते. आणि अशा कलाकृतींचा आवर्जून वेळ काढून घेतलेला अनुभव प्रेक्षक म्हणून आपली जाण वाढवणारे असते. म्हणूनच 'लेथ जोशी' हा चित्रपट एक चुकवू नये असा उत्कट अनुभव ठरतो.

-श्रीराम मोहिते
 ९८२२४६०१७४
shrirammohite@gmail.com
(लेखक साहित्य, चित्रपट आणि माध्यम अभ्यासक आहेत.) 


Comments

Popular posts from this blog