काला : 'थलैवा'स्टाईल राजकीय भाष्य
-श्रीराम मोहिते

रजनीकांतच्या चित्रपटांचा स्वतःचा असा एक चाहता वर्ग आहे. चित्रपटातून फार खोल जाणारा गहन विषय वगैरे न मांडता प्रेक्षकाला दोन-तीन तास एका स्वप्नमय विश्वात घेऊन जाण्याची किमया रजनीकांतचे चित्रपट साधत आले आहेत. 'थलैवा' हे नामाभिधान मिरवत रजनीकांतचे चित्रपट आपल्या बहुतांशी अतार्किक आणि अतींद्रिय वाटणाऱ्या करामतींनी एका विशिष्ट प्रेक्षकवर्गाची रंजनाची गरज भागवण्यात कमालीचे यशस्वी ठरले आहेत. खास रजनी स्टाईल स्लो मोशन सिक्वेन्स, क्लोज अप्सचा मुक्त वापर, ३६० डिग्री शॉट्स, डोळ्याचे पारणे वगैरे फेडणारे अँक्शन सीन्स, रंगीबेरंगी कपड्यातले ठेकेदार डान्स, आणि रजनीची प्रतिमा 'लार्जर दॅन लाईफ' बनवणारे खुमासदार डायलॉग यामुळे रजनीकांत या प्रेक्षकवर्गाच्या गळ्यातला ताईत बनलेला आहे. काला हा पा रणजित दिग्दर्शित चित्रपट मात्र रजनीकांतच्या 'लार्जर दॅन लाईफ इमेज'ला बऱ्याच अंशी ( पूर्णपणे नव्हे) मोडीत काढत वास्तववादी आणि अधिक मानवी बनवतो. आणि महत्वाचे म्हणजे त्यापुढे जाऊन समकाळाला भिडत एक ठोस राजकीय सामाजिक भाष्य करू पाहतो हे या चित्रपटाचे सर्वात महत्त्वाचे यश म्हणता येईल. रजनीकांतची याआधीची हिरॉइक प्रतिमा मोडून तिला बऱ्याच अंशी मानवी रुपडे देण्याचे धाडस हा चित्रपट करतो. म्हणूनच काला हा चित्रपट टिपिकल 'रजनी'पटापेक्षा वेगळा आणि आणि त्यामुळेच अर्थपूर्णही ठरतो. चित्रपटाच्या सुरुवातीपासूनच त्याचे हे वेगळेपण अधोरेखित होत जाताना दिसते. सुरुवातीच्या प्रसंगात काला (रजनीकांत) झोपडपट्टीत लहान मुलांबरोबर क्रिकेट खेळत असतो. रजनी बॅट हातात घेतो त्याक्षणी रजनी फॅन्स अपेक्षा ठेवतात की आता तो नक्की षटकार खेचणार. बॉल किती लांब जाईल याचे आडाखे प्रेक्षक मनाशी जुळवत असतानाच काला त्रिफळाचित होतो. टीपिकल रजनी फॅन्सना सुरुवातीलाच बसलेला हा धक्का या चित्रपटाची वेगळी आणि अधिक वास्तववादी वाट अधोरेखित करणारा ठरतो. अर्थात हा चित्रपट पूर्णपणे रजनीची रूढ प्रतिमा मोडतो असेही नाही काही प्रसंगात तो अस्सल रजनी स्टाईल रूपात येतोही. विशेषतः उड्डाण पुलावर घडणारा ऍक्शन सिक्वेन्स खास रजनी स्टाईल मारधाड असणारा आणि रजनीच्या अस्सल प्रेक्षकांना खुश करणारा आहे. म्हणजेच हा सिनेमा एकाच वेळी रजनीची रूढ प्रतिमा जपत तिला एक नवी वेगळा आयाम देण्याचा प्रयत्न करतो. काला हा चित्रपट जितका रजनीचा आहे तितकाच तो दिग्दर्शकाचा म्हणजेच
पा रणजित यांचाही आहे. राजकीय आणि सामाजिक शोषणाचा समकालीन संदर्भ तपासणारा हा एक खूपच थेट आणि टोकदार प्रयत्न आहे. हा चित्रपट प्रतीकांचा ठळक वापर करत एखाद्या सामाजिक चळवळीतल्या कलात्मक हत्यारासारखा त्यांचा वापर करतो हे त्याचे महत्वाचे वेगळेपण आहे.चित्रपटाची कथा साधी सरळ आणि सुटसुटीत आहे. देशातली सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीची पार्श्वभूमी लाभलेल्या या चित्रपटात झोपडपट्टी पाडून रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली झोपडपट्टीची जमीन हडप करण्याचा प्रयत्न हरिभाऊ अभ्यंकर ( नाना पाटेकर) हा एक बडा राजकीय नेता करत असतो. हरिभाऊला धारावीवर सत्ता हस्तगत करायची आहे.पण ती त्याला साध्य न होण्यात महत्वाचा अडथळा असतो धारावीचा मसीहा असणारा काला (रजनीकांत).हरिभाऊला धारावीवर राजकीय सत्ता हवी असते आणि तिथली जमीन हडप करून आर्थिक सत्तेवरही त्याचा डोळा असतो.झोपडपट्टीत राहणाऱ्या कष्टकरी वर्गाला तथाकथित विकासाचे गाजर दाखवून 'झोपडपट्टी हटाव' आणि प्युअर सिटी सारख्या गोंडस नावांनी नटलेली पण आतून पोकळ स्वप्नं विकून येनकेनप्रकारे सत्ता हस्तगत करायची असते.आणि त्याच्या मार्गात शोषितांचा आवाज असणारा काला पूर्ण ताकदीने उभा राहून कसा लढा देतो.या लढ्यात तो यशस्वी ठरतो का ? रजनीच्या इतर चित्रपटांप्रमाणे आपल्या अचाट कारनाम्यांनी तो शत्रूला नेस्तनाबूत करतो का याची उत्तरे मिळण्यासाठी हा चित्रपट पाहायला हवा.
हरिभाऊचे जमीन हडप करण्याचे जे मोठे षडयंत्र लपलेले असते त्याचा सामाजिक संदर्भ तपासत चित्रपट एक भेदक राजकीय विधान करतो. राजकीय हव्यासाची अजस्त्र आकांक्षा असणारा हरिभाऊ आणि त्याच्या पुढे समर्थपणे उभा ठाकलेला काला यांच्या शह-काटशहाची ही उत्कंठावर्धक गोष्ट आहे.
कालाला सावलीसारखी साथ देणारी त्याची पत्नी सेल्वी( ईश्वरी राव) पूर्वाश्रमीची प्रेयसी झरीना ( हुमा कुरेशी) यांच्या उपकथानकांतून चित्रपटाला एक संवेदनशील हळवा पदर दिला गेला आहे यातला झरीनाचा ट्रॅक काहीसा लांबल्याने काहीसा कंटाळवाणा होतो. ते टाळले असते तर अधिक गोळीबंद झाला असता.दिग्दर्शक पा रणजित यांनी  काला आणि हरिभाऊ यांच्या व्यक्तिरेखा चित्रपटातून फारच हुशारीने आणि सूचक राजकीय विधान करण्यासाठी कल्पकतेने उभ्या केल्या आहेत. काला नेहमी काळे कपडे घालतो जे कष्टकरी वर्गाचे, दलितांचे आणि शोषित वर्गाचे एक प्रतीक म्हणून येते. हरिभाऊ पूर्ण पांढऱ्या कपड्यात वावरतो. जो पांढरपेशा,शोषक वर्गाचे प्रतीक दर्शवतो. संपूर्ण चित्रपटभर वापरण्यात आलेले आंबेडकर, फुले, बुद्ध ,पेरियार यांचे फोटो, पार्श्वभूमीला सतत दिसणारे बौद्धविहार, निळा(आंबेडकर) ,लाल (क्रांतीचे प्रतीक), आणि काळ्या रंगाचा (कष्टकरी लोकांचे प्रतीक) सूचक वापर यामधून पा रणजित यांनी ‘आंबेडकरवादा’ला ग्लोबलाझेशनच्या संदर्भांची जोड देण्याचा प्रयत्न केल्याचे जाणवते. दिग्दर्शक पा रणजितचा हा चौथा चित्रपट आहे. शोषित वर्गाची जाणीव त्याच्या चित्रपटातून नेहमीच व्यक्त झालेली आहे. ‘अत्तकाठी’, ‘मद्रास कबाली’ आणि आता ‘काला’ या चित्रपटातून पा रणजित शोषणाच्या व्यवस्थेविरुद्ध बोलू पाहतो आहे. पृथ्वी शेषनागावर नव्हे तर कामगारांच्य तळहातावर तोलली गेली आहे हे अण्णाभाऊ साठेंच विधान यथार्थपणे चित्रपट पुढे नेतो. त्याला समकालीन संदर्भात अधिक उजागर करतो. ‘ये जमीन तेरे लिये पॉवर होगी, हमारे लिये जिंदगी है' सारखे रजनी स्टाईल संवाद या कथेचा शोषणविरोधी आशय अधिक गडद करतात.'काला' या शीर्षकातून काळ्या रंगाचे सौंदर्य ठसवित गोरेपणाच्या जातिवर्णवर्चस्ववादी दृष्टीकोनाला एक उत्तर देण्याचा प्रयत्न जाणवतो. भारतीय संस्कृतीत काळा हा सौन्दर्याचे प्रतीक बनून येतो. कृष्ण,महादेव,राम हे वर्ण व पितृसत्तेचे समर्थक काळ्या रंगाचे आहेत. बुध्द गौरवर्णी असूनही काळ्या रंगाच्या सौंदर्याचा समर्थक होता. पुराणात राक्षस, असूर, दानवही काळेच आहेत. महानुभाव व दाक्षिणात्य लिंगायतांनीही काळ्या वस्त्रे पवित्र मानली. वारक-यांचा विठ्ठलही काळाच आहे.महात्मा फुल्यांनी काळ्यांच्या मुक्तीसंघर्षालाच आपले 'गुलामगिरी' हा ग्रंथ अर्पण केला. आपल्या तथाकथित मुख्य धारेतल्या हिंदी व प्रादेशिक सिनेमाने काळ्या रंगाला तिरस्करणीय मानून गो-या रंगांचे स्तोम सतत पोसले आहे. भारतातल्या सौन्दर्य प्रसाधनांच्या मार्केटची प्रचंड उलाढाल बघितली की काळेपणाच्या न्यूनगंडाने पछाडलेली ही मानसिकता किती खोलवर रुजली आहे याचा व्यापक प्रत्यय येतो. नेमक्या ह्याच वर्णवर्चस्ववादी वृत्तीवर काला प्रहार करताना दिसतो. कष्टकरी जनतेच्या हक्काच्या मायभूमीचा हा मुक्ती संघर्ष 'ब्लॅक पॅन्थर'सारख्या चळवळीशी साम्य दाखवणारा आणि रजनीच्या पडद्यारील याआधीच्या कृतक नायकत्वाला दलित नायकाच्या पातळीवर आणून अधिक अर्थपूर्ण बनवतो. नाना पाटेकरांचा हरीभाऊ अभ्यंकर नुसता नावाने किंवा कपड्यातूनच नव्हे तर वर्तनातूनही पितृसत्ताक आणि धर्मांध मूलतत्त्ववादी वृत्तीचा प्रतिनिधी वाटतो. चित्रपट वापरण्यात आलेले राम-रावण युद्धाचे प्रतीकही पौराणिक आख्यानांची नवी चिकित्सा करणारे आहे.यासारखे अनेक रुढ संकेत मोडून हा चित्रपट प्रस्थापित व्यवस्थेपुढे अनेक धारदार प्रश्न ठेऊ पाहतो. आणि अर्थातच या वास्तववादी प्रतीकात्मक वाटेने जाण्यासाठी रजनीला आपली पारंपरिक 'थलैवागिरी' बऱ्याच अंशी बाजूला ठेवावी लागली आहे. बऱ्याच प्रसंगात आता तो स्टाईलमध्ये चष्मा फिरवत त्याची ती खास स्टायलिश हाणामारी करेल असे वाटत असतानाच तो लढतच नाही; त्याचे साथीदार किंवा मुलंच लढतात. पारंपरिक रजनीपटांना बगल देणाऱ्या या वास्तववादी हाताळणीमुळेच हा चित्रपट रजनीकांतच्या करियरला एक वेगळे वळण देणारा ठरू शकतो. त्याच्या स्टिरिओटाईप इमेजला फाटा देणारा असूनही हा चित्रपट आपल्या खास 'थलैवा'प्रेमींना पूर्णपणे निराश करतो असे मात्र नाही. खास रजनी स्टाईल पद्धतीने चित्रित केलेले काही प्रसंगही मस्त जमून आलेत आणि ते चाहत्यांना त्यांचा मनसोक्त आनंदही मिळवून देतातच. अभिनयाच्या आघाडीवर सर्वच कलावंतांनी उत्तम कामगिरी केली आहे. विशेषतः नाना पाटेकरांनी उभा केलेला हरिभाऊ अक्षरशः अविस्मरणीय आहे.एखाद्या भ्रष्ट राजकीय नेत्याकडे असू शकणारा आत्यंतिक तुसडेपणा नानांनी बेमालूमपणे अंगात मुरवलाय.अतिशय बेदरकार वृत्तीचा पण थंड डोक्याचा हा कावेबाज हरिभाऊ नानाच्या सर्वोत्तम भूमिकांपैकी एक ठरेल इतका अफलातून जमून आलाय. नायककेंद्री पटकथेचे आणि टाळ्याखाऊ डायलॉगचे बळ घेऊन उभ्या असलेल्या रजनीकांतला नाना आपल्या आंगिक आणि वाचिक अभिनयाच्या बळावर अनेकदा कसा वरचढ ठरताना दिसतो हे पाहण्यासारखे आहे. नानासारख्या कसलेल्या अभिनेत्याची ताकद अनुभवायची असेल तर हा चित्रपट पाहणे गरजेचे ठरते.कालाच्या मध्यवर्ती भूमिकेत रजनीकांत यांनीही चांगले रंग भरलेत.
पहिल्या अर्ध्या भागात त्यांना तुलनेने संवाद कमी असूनही देहबोली आणि मुद्राभिनयातून त्यांनी व्यक्तिरेखा सुरेख उभी केलीय. काला हे पात्र काय आहे हे ठसवणारे दोन प्रसंग खास बघण्यासारखे आहेत. पहिला पोलीस स्टेशनमध्ये  मिनिस्टरची(सयाजी शिंदे) दारूच्या नशेत मस्त फिरकी घेणारा प्रसंग मजा आणतो. दुसऱ्या प्रसंगात काला हरीदादाच्या घरी जातो, तेव्हा त्याच्यावर आभाळ कोसळलेलं असतं. त्यात  संवादापासून ते प्रसंगानुरूप हसण्यापर्यंत रजनीकांतनी दाखवलेले पैलू खासच आहेत.
रजनीच्या स्टारडमचा उपयोग करत हा चित्रपट अनेक पारंपरिक संकेत मोडीत काढतांना दिसतो. कालाच्या घरी हरिभाऊ पाणी पीत नाही पण पुढे हरिभाऊंच्या घरी मात्र काला पाणी पिल्याचे दाखवून चित्रपट स्पृश्य-अस्पृश्यतेसंबंधी सूचक भाष्य करतो. काला हरिभाऊंच्या नातीला पाय पडू देत नाही फक्त नमस्कार करायला सांगतो.हा प्रसंगही यादृष्टीने महत्वाचा आहे.
अंजली पाटील, पंकज त्रिपाठी, संपथ राज, ईश्वरी राव, सयाजी शिंदे, हुमा कुरेशी यांचा उत्तम अभिनय ही चित्रपटाची मोठी ताकद ठरते. विशेषतः ईश्वरी राव यांची सेल्वी आणि हुमा कुरेशी यांची झरीना यांनी साकारलेल्या भूमिका लक्षात राहतात. काहीशी खट्याळ, फटकळ पण नवरा आणि मुलांसोबतच्या नात्यात विरघळून गेलेली सेल्वी ईश्वरी राव यांनी तन्मयतेने सकरलीय. झरीना आणि कालाचे असफल पण तरल,अव्यक्त प्रेम चित्रपट उत्तमपणे मांडतो. मात्र हा भाग अधिक गोळीबंद असायला हवा होता असे वाटते. मुरलीजींचं छायांकन हे या चित्रपटाला दृश्यात्मक सौन्दर्य देणारे ठरते. झोपडपट्टीचे विलक्षण दर्शन घडवताना कॅमेराने अक्षरशः कमाल केली आहे. पुलावर घडणारा खास रजनी स्टाईल मारामारीचा प्रसंग त्यातल्या कॅमेरावर्कमुळे अप्रतिम परिणाम साधतो. अपघाताच्या एका सिक्वेन्सचे टेकिंग तर केवळ थक्क करणारे आहे. संतोष नारायण यांचं पार्श्वसंगीत आशयाच्या जागा सुंदर रीतीने गुंफत जाते.
या चित्रपटाचा शेवट अनेकार्थाने वेगळा आणि या चित्रपटाने स्वीकारलेल्या प्रतिकात्मक वाटेने जाणारा आहे. या प्रसंगात केला गेलेला रंगांचा वापर आणि पार्श्वसंगीत यामुळे तो अधिक धारदार बनतो. व्यवस्थेविरुद्धच्या,शोषणाविरुद्धच्या या लढ्याचे नायकत्व व्यक्तीकडून समष्टीकडे घेऊन जाण्याचा आग्रह हा चित्रपट धरतो आणि विशाल राजकीय परिप्रेक्ष्यातल्या समकालीन आशयाचा मोठा ऐवज कवेत घेतो.आणि हे सारे रजनीकांतच्या सिनेमातून; त्याची तथाकथित प्रतिमा सांभाळत घडते ही आश्वासक गोष्ट मानावी लागेल.

-श्रीराम मोहिते
 ९८२२४६०१७४
shrirammohite@gmail.com

Comments

Popular posts from this blog

स्वत्वशोधाचा मुग्ध प्रवास : लेथ जोशी