काला : 'थलैवा'स्टाईल राजकीय भाष्य -श्रीराम मोहिते रजनीकांतच्या चित्रपटांचा स्वतःचा असा एक चाहता वर्ग आहे. चित्रपटातून फार खोल जाणारा गहन विषय वगैरे न मांडता प्रेक्षकाला दोन-तीन तास एका स्वप्नमय विश्वात घेऊन जाण्याची किमया रजनीकांतचे चित्रपट साधत आले आहेत. 'थलैवा' हे नामाभिधान मिरवत रजनीकांतचे चित्रपट आपल्या बहुतांशी अतार्किक आणि अतींद्रिय वाटणाऱ्या करामतींनी एका विशिष्ट प्रेक्षकवर्गाची रंजनाची गरज भागवण्यात कमालीचे यशस्वी ठरले आहेत. खास रजनी स्टाईल स्लो मोशन सिक्वेन्स, क्लोज अप्सचा मुक्त वापर, ३६० डिग्री शॉट्स, डोळ्याचे पारणे वगैरे फेडणारे अँक्शन सीन्स, रंगीबेरंगी कपड्यातले ठेकेदार डान्स, आणि रजनीची प्रतिमा 'लार्जर दॅन लाईफ' बनवणारे खुमासदार डायलॉग यामुळे रजनीकांत या प्रेक्षकवर्गाच्या गळ्यातला ताईत बनलेला आहे. काला हा पा रणजित दिग्दर्शित चित्रपट मात्र रजनीकांतच्या 'लार्जर दॅन लाईफ इमेज'ला बऱ्याच अंशी ( पूर्णपणे नव्हे) मोडीत काढत वास्तववादी आणि अधिक मानवी बनवतो. आणि महत्वाचे म्हणजे त्यापुढे जाऊन समकाळाला भिडत एक ठोस राजकीय सामाजिक भा...